घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.
दुर्मीळ झाला वाघाटीचा वेल.
उत्तम ब्राम्हणवाडे.
वाघाटी आषाढी एकादशीसाठी महत्त्वाचे फळ मानले जाते. द्वादशीचा उपवास सोडण्यासाठी याचा वापर केला जातो गेल्या कित्येक वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. आषाढी एकादशी आणि वाघाटी यांचं नातं याबाबत अद्याप माहिती उपलब्ध नाही.
आषाढी एकादशीचा उपवास सोडताना ताटात वाढली जाणारी वाघाटी हे फळ आता काळाच्या ओघात नामानेष होत चालले आहे. शेताच्या बांध, परसबागेतील झाडावरील वाघाटीचा वेल आता सिमेंटच्या जंगलात दुर्मिळ झाले आहे. सध्या ग्रामीण भागात वाघाटीचा दर हा 100 ते 200 रुपये किलो दराने विकली जात आहे. आषाढी एकादशी उजाडली की, उपवास धरणाऱ्या वारकऱ्यांना वाघाटी (गोविंद फळ) हिरव्याकंच फळांचे वेध लागतात. उपवास सोडताना ही भाजी खाण्याची पूर्वापार प्रथा आहे. विशेष म्हणजे याच कालावधीत ही फळे तयार होतात. नंतर ती तोडून बाजारात विक्रीस आणली जातात. परंतु अलीकडे तर वाढत्या वृक्षतोडीमुळे वाघाटी या फळाचे दर्शन दुर्मिळ झाले आहे. पाणंद, ओढ्याच्या काठावर असणारी दाट झाडीत वाघाटीचे वेल फुलतात. इतर झाडावर वाढणाऱ्या वाघाटीच्या झळकट काटेरी वेलाचे प्रमाण खूप कमी झाले आहे. त्यामुळे वाघाटीचा वेल पुढील येणाऱ्या पिढीला माहिती व्हावा, आषाढी एकादशीनिमित्त त्याचे महत्व टिकावे आणि निसर्गातील अन्नसाखळी अबाधित राहावी, याकरिता वाघाटचे संवर्धन होणे आवश्यक आहे. हा वेल आयुर्वेदिक दृष्ट्या महत्वाचा आहे, पण फुलपाखरांच्या जीवनचक्रातही वाघाटी महत्वाची आहे.या फळाचा भाजी प्रकारात समावेश होत असला तरी वाघाटीचा वेल रुजवणे त्यांचे संवर्धन करणे, त्यापासून फळांचे उत्पन्न घेणे शक्य नाही. हा वेल नैसर्गिकरीत्या गर्द झाडीत वाढतो. आषाढी एकादशी आली की, मगच सर्वांना वाघाटीची आठवण येते. आताच्या नवीन पिढीला तर या वाघाटी विषयी फारशी माहिती नाही. आयुर्वेदिक महत्त्व वर्षातून एकदा आषाढी एकादशीला हे फळ खाण्यामागे आयुर्वेदाचा विचार केला आहे.श्वास घेताना छाती व पोटात जळजळणे, डोके आणि चेहऱ्यावरील चेतापेशीत तीव्र वेदना होणे, लहान मुलांमध्ये वाऱ्यांमुळे निर्माण होणारी पोटदुखी, शरीराच्या कोणत्याही भागात कंट सुटणे व दुखणे, विषारी द्रव्य पोटात गेल्यानंतर मळमळने, ताप उतरवणे, हगवण लागणे, शरीराच्या विशिष्ट भागात सूज आल्यानंतर, सर्दी, खोकला, अनेक विषाणुजन्य आजार, याच बरोबर अनेक प्रजातींच्या कृमिचा नाश होण्यासाठी वाघाटीची फळे, पाने व मुळे यांचा वापर केला जातो.
Comments