विषमुक्त शेतीचे महत्त्व आणखी वाढणार.
दिवसेंदिवस शेतीत आमूलाग्र बदल होत आहे. आधुनिकतेचा अवलंब करताना पारंपरिक शेती नाममात्र राहिली आहे. सध्या बागायती एरियात फवारल्या जाणाऱ्या औषधांचे प्रमाण वाढते असल्याने याबाबत शेतकऱ्यांनीच आता योग्य ती काळजी घेण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे. दरम्यान, फवारणीमुळे शेतीची प्रतही खालावत असल्याने भविष्यात विषमुक्त शेतीचे महत्त्व आणखी वाढणार आहे.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात सोयाबिन, गहू , हरभरा , कपासी , कांदा , वांगी व इतर पालेभाज्या या पिकांवर फवारणी केली जाते. शेतीमध्ये होत असलेल्या बदलामुळे पिकांचा कसदारपणा कमी होवू लागला आहे. सर्वत्र रासायनिक मात्रा मोठ्या प्रमाणात दिली जात असल्यामुळे पारंपरिक शेतीचा पोत आता राहिलेला नाही. शेतकरी पारंपरिक शेतीतून बाहेर पडत आहे.अधिक उत्पन्नाच्या हव्यासामुळे रासायनिकतेची कास धरली जात आहे. याचा पिकांवर दूरगामी परिणाम होऊ लागला आहे.
शेतकऱ्यांनी कोणतीही फवारणी करताना काळजी घेणे गरजेचे आहे. कारण सध्या मार्केटमध्ये औषध बनविणाऱ्या विविध कंपन्या उदयास येऊ लागल्या आहेत. स्वस्त व भारी क्वॉलिटीची औषधे म्हणून काही कंपन्या औषध विक्रीचे नानाविध फंडे वापरत आहेत. या फंड्यांना भुलून शेतकरी फवारणीसाठी औषधे खरेदी करतो खरे. पण, यातील काही विषारी औषधे शेतकऱ्यांसाठी धोकादायक ठरत असल्याची बाब स्पष्ट होत आहे. शेतीतील पिकांवर फवारली जाणारी औषधे अथवा कीटकनाशके किती विषारी आहेत? ती कशा पद्धतीने पिकांवर फवारायची? याचं ज्ञान शेतकऱ्यांना देणे गरजेचे आहे. तसेच आपल्या शेतीचा पोत सुरक्षित राहण्यासाठी खरी काळजी शेतकऱ्यांनी घेणं गरजेचं आहे.
मार्केटमध्ये शेतीच्या औषध विक्रीसाठी मोठी स्पर्धा सुरु आहे. औषध विक्रीच्या विविध कंपन्या उदयास येऊ लागल्यामुळे अवैध प्रकारची औषधेही बाजारात येऊ लागली आहेत. त्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. जमिनीमधील कोणत्याही पिकावर औषध फवारणी करताना जमिनीची प्रत खराब न होईल याकडे शेतकऱ्यांनी लक्ष द्यायला हवे. याबाबत शेतकऱ्यांनी कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन जागरुक राहण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे.
स्वस्त व भारी क्वॉलिटीची औषधे म्हणून काही कंपन्या औषध विक्रीचे नानाविध फंडे वापरत आहेत. पण, यातील काही विषारी औषधे शेतकऱ्यांसाठी धोकादायक ठरत असल्याची बाब स्पष्ट होत आहे.
Comments