नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार मंदावले.
उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर.
सर्वत्र नगदी पीक व पांढरे सोने अशी ओळख असलेल्या कापसाला बाजरात योग्य भाव मिळत नसल्याने नांदगाव खडेश्वर सह परिसरातील शेतकरी हवालदिल झालेलादिसून येत आहे. घरातच कापसाच्या गंजी लागून आहेत. परिणामी शेतकऱ्यांकडे पैसे नसल्याने बाजारपेठेतील व्यवहारही ठप्प झाली आहेत. यंदा पांढऱ्या सोन्याने बाजार थंडगार केल्याचे चित्र आहे.
मागील वर्षी कापसाला चांगला भाव मिळाल्याने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील आणि परिसरातील शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात कपाशी या पिकाची लागवड केली होती. मात्र यंदा भाव नाही. ग्रामीण भागातील आठवडे बाजार, छोट्या बाजारपेठेची सर्व दारोमदार शेतमालाच्या विक्रीवर आहे. बाजारात कापूस विक्रीला आणल्यानंतर शेतकऱ्यांच्या खिशात पैसे येतात, त्यावर मग बाजारात विविध खरेदी केली जाते. शिवाय गावपातळीवर छोट्या व्यवसायालाही चालना
मिळते. यात टेलरिंग, पिठाच्या गिरण्या, कृषी केंद्र, किराणा दुकान, मजुरी, सालदार व सर्व आवश्यक बाबींचे पैसे हे शेतकऱ्यांचा माल विकला की चुकते होतात. आता जानेवारी संपून फेब्रुवारी महिना लागला तरी अजून कापसासोबतच अन्य शेतमालाचे भाव वाढत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री थांबवलेली आहे.
आज ना उद्या पिकांना भाव मिळेल या आशेवर शेतकऱ्यांच्या घरात म्हणून शेतमालाच्या गंजी पडून आहेत. यातही अनेक दिवसांपासून कापूस अनेक शेतकऱ्यांनी भाव वाढीच्या अपेक्षेने घरातच साठवून ठेवलेला आहे. भाववाढ होण्याचे काहीच चिन्हे दिसत नाहीत. त्यातच गावात कापसाचा व्यापारीसुद्धा फिरकत नाही.
शेतकऱ्यांना मागच्या वर्षी एप्रिल - मे महिन्यात कापसाला १५ हजाराच्या जवळपास भाव मिळाला असल्याने यावर्षी सुद्धा त्या आशेपोटी काही शेतकऱ्यांनी कपाशी लावली .मात्र अतिवृष्टीमुळे कमी प्रमाणात कापूस झाला . भाववाढ होईल म्हणून तालुक्यातील शेतकरी हा वाट पाहतो आहे . परंतु कापसाचे व्यापारी गावात फिरकत सुद्धा नाहीत ही वस्तुस्थिती आहे.
यावर्षी शेतमालाला चांगला भाव मिळेल या आशेने तालुक्यातील शेतकऱ्यांनी पऱ्हाटी पेरली,परंतु अस्मानी संकटाने उत्पनात मोठ्या प्रमाणात घट झाली .लागवडीला पुरेसा एवढा पैसा सुद्धा उत्पन्नातुन वसूल होत नाही . भाववाढ होईल म्हणून कापूस , सोयाबीन ,तूर शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे .
Comments