निसर्गाच्या अवकृपेने शेतकऱ्यांचा कल शेती मक्त्याने देण्याकडे!
निसर्गाच्या अवकृपेने शेतकऱ्यांचा कल शेती
मक्त्याने देण्याकडे!
शेतीच्या वाढत्या खर्चामुळे बिघडले संतुलन.
शेतीचा व्यवसाय झाला बिन भरवशाचा.
उत्तम ब्राम्हणवाडे.
शेती उत्पादनाचा वाढता खर्च, पावसाचे बिघलेले संतुलन आणि शेतीमालाला मिळणारा अत्यल्प भाव यामुळे ही व्यवस्था सदोदीत शेतीसाठी हानिकारकच असल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांचा कल शेती मक्त्याने देण्याकडे वाढत आहे. ज्यांना शेतीशिवाय पर्यायच नाही आणि घरात चारजण राहून शेतीत राबु शकतात, असे शेतकरीच शेती मक्त्याने घेऊन परंपरागत व्यवसायावर गुजराण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
कृषी प्रधान समजल्या जाणाऱ्या देशात आता शेतकरीच पराधीन झालेला असून, शेती व्यवसाय हा बिनभरवशाच बनला आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यासह परिसरातील सिंचन क्षेत्र कमी असल्यामुळे व एखाद्या कॅनॉलचे मायनर सुध्दा नसल्याने बागायतीपेक्षा जास्तीत जास्त शेती कोरडवाहू असल्यामुळे पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते.दरवर्षी सोसायटी,बँक अथवा सावकारांकडून कर्ज काढून शेती करावी लागते. ३१ मार्चपर्यंत कर्जाची परतफेड करण्याच्या अटीवर शासन शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देत असतो. मात्र शेतीतील लागवडीचा खर्च व उत्पन्न यातून येणारी रक्कम याचा ताळेबंद अखेर तोट्याचा होतो. परिणामी अनेक शेतकरी कर्जाची मुद्दलही भरू शकत नाहीत. कर्ज थकले की, ते दरवर्षी शेतकऱ्यांच्या डोक्यावर भार बनूनच राहते सद्यस्थितीत शेती करणे म्हणजे जुगार खेळण्यासारखीच परिस्थिती बनत चालली आहे.
सालदाराचे वेतन लाखावर पोहोचले आहे. शेतीसाठी आवश्यक बैलजोडीच्या किंमतीही लाखांच्या घरात पोहोचल्याने सर्वांचाच कल आता ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी, वखरणी शेतीचे कामे यंत्राद्वारे करून घेत असल्याने खर्चीची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
एवढेच नव्हे तर मजुरांची टंचाईसुध्दा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना भासत असल्याने मुह मांगे दाम देऊन शेतीची कामे करून घ्यावे लागत आहेत.बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके, तणनाशक यांच्या किंमती शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणाऱ्या ठरल्या आहेत.
कृषी केंद्राचे चालक शेतकऱ्यांना लुबाडून त्यांना कंगाल करण्याचा बेतात असल्याचेही कित्येकदा शेतकऱ्याने अनुभवले आहे. त्यामुळे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त, वर्षभर राबराब राबुनही वर्षाअखेर सर्व खर्च वजा जाता
शेतकऱ्यांच्या हाती नफा शिल्लक राहत नाही, ही वस्तुस्थिती गेल्या चार वर्षापासून शेतकऱ्यांची आहे. त्यामुळे शेती मक्त्याने देऊन एकरकमी पैसा हातात पाडून घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. गेल्या दोन वर्षांपासून अतिवृष्टी व परतीच्या पावसाने व गारपीटीमुळे सोयाबीन, कापूस, तूर, मुग, उडीद, भाजीपाला आदी नगदी पिके हाता- तोंडाशी येऊन हिरावल्या जात आहे..
..............................................
पूर्वी शेतकऱ्याकडे गोधन असायचे त्यापासूनच शेतात राबण्यासाठी बैल तयार व्हायचे आता चारा पाण्याची टंचाई तसेच राखणदार गड्याची मजूरी शेतकऱ्यांना परवडत नसल्याने शेतकऱ्याकडे गाईची वानवाच दिसून येते. त्यामुळे बैलजोडी म्हातारी व थकल्यास सर्वसाधारण शेतकऱ्यांना दुसरी तरणीबांड जोडी घेणे आर्थिक दृष्ट्या शक्य होत नाही. त्यामुळे अनेकदा नाईलाजाने शेती ठेक्याने घ्यावी लागत आहे.
Comments