तरुणाईला लागले रस्त्यावरच्या वाढदिवसाचे वेढ
तरुणाईला लागले रस्त्यावरच्या वाढदिवसाचे वेढ
प्रथा होत आहे दिवसे दिवस रूढ.
वाढदिवसासाठी उधळतात पैसा
उत्तम ब्राम्हणवाडे
सध्या नांदगाव खंडेश्वर शहरातील गल्लीबोळात व सार्वजनिक रस्त्यावर एखाद्या मुलाचा, नेत्याचा किंवा कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा वाढदिवस साजरा करण्याची प्रथा सर्वत्र रूढ होत असताना दिसून येत आहे. रस्त्याच्या कडेला उभे राहुन दुचाकी, किव्हा कारवर केक कापला जातो. दुकानातून आवश्यकतेनुसार केक खरेदी करायचा आणि गावाबाहेर, आपल्या गल्ली, नगरात किंवा जेथे सोयीस्कर होईल तेथे रस्त्यावरच वाहन उभे करून हॅप्पीवाला बर्थ डे साजरा करण्याचे प्रमाण आता दिवसे दिवस वाढतच आहे. घरदार सोडुन मित्र, मैत्रिणीसह रस्त्यावर अधिकच मनमोकळेपणाने वाढदिवस साजरा होत असल्याने पाश्चिमात्य संस्कृतीत युवक बुडत असल्याचे दिसून येत आहे.
आतापर्यंत पुढारी, अभिनेते, उद्योजक, प्रतिष्ठित व्यक्ती यांचेच वाढदिवस आणि जयंत्या साजऱ्या होत होत्या. काही वर्षांपूर्वी हा ट्रेंड होता. आता मात्र ही गोष्ट जुनी झाली आहे. हल्ली गल्लीबोळात भाई, दादा, मामा, काका आदींच्या वाढदिवसाचे स्तोम माजल्याचे दिसून येत आहे. एकेकाळी बड्या नेत्यांचाच वाढदिवस साजरा होत होता.परंतु सध्या लहान मुलांपासून ते कार्यकर्त्यांचे वाढदिवस साजरा करण्याचे प्रमाण वाढत आहे. किंग नाही किंगमेकर, दिलखुलास व्यक्तिमत्त्व, माऊंचे काळीज, आमचे आधारवड, गरिबांच्या मदतीला धावून येणारा देव माणूस, भावी सरपंच भावी नगरसेवक, भावी जिल्हा परिषद सदस्य अशा पोष्ट सोशल मिडीयावर दररोज डझनाच्या संख्येने बघायला मिळतात. कोरोनासारख्या आजाराने नागरिकांना जखडल्यानंतरही वाढदिवस सेलिब्रेशनचे प्रमाण कमी झाले नाही. वाढदिवस कोणाचाही असो, एकाने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या की, शुभेच्छांचा वर्षावच समाज माध्यमावर सुरू होऊन जातो. आगामी निवडणुकीच्या तोंडावर तर हे फॅड अधिकच वाढले आहे.
येरव्ही भ्रमणध्वनीवरून शुभेच्छा देऊन कार्यकर्ते व मतदारांना खुश करणारे नेते आता थेट त्यांच्या घरी जाऊन शुभेच्छा देत त्यांना केक भरवीत आहेत.तर काही नेते बर्थ डे पार्टीमध्ये आवर्जून उपस्थिती लावत आहे. मुळशी पॅटर्न चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हापासून तरुणाईमध्ये वाढदिवस साजरा करण्याची वेगळीच क्रेझ निर्माण झाली आहे. वाढदिवस थाटात साजरे करण्याची संस्कृती ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागात डीजे, केक काटने आणि मित्र परिवारास हॉटेलवर जेवण हेही मोठ्या प्रमाणात बघण्यास मिळत आहे. सध्या कोणाचा वाढदिवस आहे, हे सोशल मिडियातून तत्काळ समजत असल्याने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचे फॅड सर्वत्र जोरात सुरू आहे. वर्षातून एक दिवस चर्चेत राहण्यासाठी युवक प्रत्येकाच्या लक्षात राहिल, असा वाढदिवस साजरा करण्याचा प्रयत्न करतात.आणि आपल्या वाढदिवशी पैश्याची चागलीच उधळपट्टी सुद्धा करतात हेच पैसे कमाविण्याकरिता त्याचे आई वडील आपल्या जीवाचे कसे रान करून आणि राब राब राबून पैसा जमा करतात याची जाणीव कदाचित या युवा पिढीला नाही हेच यावरून दिसून येते.
Comments