यंदा गावरान आंब्याची चव झाली दुर्मिळ!
निसर्गाच्या अवकृपेने ओढवली परिस्थिती.
उत्तम ब्राम्हणवाडे.
उन्हाळा आला की आंब्याची चव केव्हा एकदा चाखतो असे सर्वांनाच होते. सामान्यपणे अक्षय तृतीयापासून आंब्याच्या आमरसाचा आस्वाद घेतला जातो. मात्र, निसर्गाच्या अवकृपेमुळे गावरान आंबा रुसलेला दिसून येत आहे. त्यामुळे यंदा आंब्याची चव चाखणे कठीण होऊन बसले आहे. सद्यस्थितीत संकरित वाणाच्या आंब्याचे भाव चांगलेच वधारले असल्याचे चित्र दिसून येत आहे.
सध्या बाजारपेठेत वेगवेगळ्या वाणाचे आंबे दिसून येत आहेत. मात्र, यात गावरान आंबे गायब झाले आहेत. गावरान आंब्याची चव सगळ्याना चाखणे अधिक पसंत आहे. तसेच गावरान आंब्याला बाजारपेठेत अधिक मागणीसुद्धा असते. शेतशिवरात मोठ्या कष्टाने देखरेख करून आंब्याची झाडे वाढविली जात असतात. मात्र, सरपणासाठी पाच दशकांपूर्वी असलेले आंब्याचे झाड आज मात्र दिसून येत नाही. तसेच निसर्गाच्या पोषक वातावरणाचासुद्धा लागवडीवर परिणाम झालेला दिसून येत आहे. यामुळे याकडे कृषी विभागाने अधिक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
..........................................
वृक्षतोडीमुळे गावरान आमराई होताहे नष्ट.
...........................................
आजी-आजोबांनी लागवड केलेली तर कोठे नैसर्गिक उगवण झालेल्या शेतातील गावरान आमवृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड होत आहे. पूर्वी प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधावर गावरान आंबे दिसून येत होते. मात्र, अलीकडील काळात शेतकऱ्यांनी झाडाखाली पिके वाढत नसल्याने तसेच लाकडांसाठी मोठ्या प्रमाणात तोड होत आहे. परिणामी गावरान आमराई नष्ट होऊन आमरसाची चव दुर्मिळ होताना दिसत आहे.
...........................................
आम्रवृक्ष लागवडीची नितांत गरज.
.............................................
यंदा निसर्गाच्या अवकृपेमुळे गावरान आंब्याला दरवर्षीप्रमाणे अधिक बहार दिसून आला नाही. त्यामुळे ग्रामीण भागात आंब्याची झाडे दिसून येत असली तरी या झाडांवर आंबे दिसून येत नाही, असे चित्र सध्या बघावयास मिळत आहे. त्यामुळे या गावरान आंब्याची चव चाखायची असेल तर वृक्ष लागवडदरम्यान आम्रवृक्ष लागवड करणे तेवढेच गरजेचे झाले आहे. अन्यथा, पुढील पिढी गावरान आंब्यापासून वंचित राहण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
..............................................
Comments