वृद्ध निराधार यांना वर्षभरापासून दोनशे रुपये कमी मानधन.
उर्वरित मानधन त्वरित जमा करण्याची लालबावटा शेतमजुर युनियनची मागणी.
उत्तम ब्राम्हणवाडे.
संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी अर्थसाह्य योजना व इतर योजना अंतर्गत वृद्ध, निराधार ,अपंग यांना वाटप केल्या जाणारे एक हजार रुपये मानधनांपैकी केवळ आठशे रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात गेल्या वर्षभरापासून जमा होत आहेत. त्यांना दरमहा दोनशे रुपये कमी रक्कम त्यांच्या खात्यात जमा होत आहे. निराधार व अपंगांना शासनाच्या अर्थसहाय्य योजनेचा आधार असून त्यातही त्यांना कमी रक्कम मिळत असल्याने त्यांना उपजीविका करणे कठीण झाले आहे. याबाबत तहसील कार्यालयात लाभार्थी विचारपूस करण्यासाठी वारंवार संपर्क करीत आहेत. निराधार वृद्ध व अपंग व्यक्ती यांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. वयोवृद्ध,ज्येष्ठ व अपंग नागरिक यांची प्राधान्याने जबाबदारी घेणे हे शासनाचे कर्तव्य आहे;मात्र याबाबत अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.करिता याबाबत योग्य ती कारवाई करून व शासनास पाठपुरावा करून उर्वरित दोनशे रुपये थकित मानधन निराधार व इतर लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात यावे, तसेच शासनाने मानधनात पाचशे रुपये वाढ करून पंधराशे रुपये मानधन जाहीर केले आहे. त्याची अंमलबजावणी करण्याबाबत शासनास सूचित करण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार पुरूषोत्तम भुसारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियनचे विभागीय संपर्कप्रमुख संजय मंडवधरे,भाकपचे जिल्हा सचिव सुनील मेटकर, कार्याध्यक्ष बाबाराव इंगळे, हनुमान शिंदे, अनिल हिवराळे प्रामुख्याने उपस्थित होते.
Comments