४० कि.मी.पर्यंत एकही वृक्ष नाही !
वाटसरूंना सावली मिळेना.
महामार्गावरील वृक्षतोडीचा परिणाम.
उत्तम ब्राम्हणवाडे.
अमरावती जिल्ह्यात अनेक ठिकाणी महामार्गाचे - बांधकाम सुरू आहे. या महामार्गाकरीता मोठ्या प्रमाणावर झालेली वृक्षतोड ही विकासकामातील सर्वात मोठी हानी ठरली . आता भयंकर अशा उन्हाळ्यात मात्र रस्त्यावरून चालताना वाटसरूंना या वृक्षतोडीमुळे सावलीला एक झाड मिळणे कठीण झाले आहे.अमरावती - बडनेरा -नांदगाव खंडेश्वर - सिंगणापूर- नेर (परसोपंत) या रस्त्याने सावली करिता एकही वृक्ष नाही. हे दुर्दैव आहे विकासाच्या नावाखाली वनराईवर कुऱ्हाड चालविणे कितपत योग्य आहे. विविध रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वृक्षांवर कुऱ्हाड सर्रास चालविण्यात येत आहे. दरवर्षी एप्रिल - मे महिन्यात फुलणाऱ्या गुलमोहरालाही या विकासाने दृष्ट लावल्याचे दिसून येते.
अमरावती - यवतमाळ हा महामार्ग जवळपास ९० कि.मीचा राज्यमार्ग असून या रस्त्याच्या विस्तारीकरणाला अद्यापही प्रारंभ न झाल्याने या महामार्गावर प्रचंड खड्डे झाले आहे त्यामुळे प्रवाशांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते. अशातच एखादा अपघात झाल्यास त्या प्रवाशांना वृक्षांची सावली मिळणे तर सोडा पिण्याचे पाणीही मिळत नाही.या महामार्गावर गर्द सावली देणाऱ्या विविध प्रजातींचे वृक्ष जसे की,आंबा, चिंच, कवट, कडूनिंब, गुलमोहर अशी वृक्ष लावण्याची मागणी होत आहे.
काही वर्षांपूर्वी निसर्गाचा हा अनमोल खजिना गेल्या कित्येक वर्षांपासून वाटसरूंना सावली देत होता. ही वृक्ष अज्ञातांनी मोठ्या प्रमाणात तोडकेली असून याकडेही सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोणत्याही प्रकारचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. या विभागाचे अधिकारी आपले कार्यालय सोडायला तयार नसल्याने हा महामार्ग उजाड झाला आहे पूर्वी या महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी लावलेली वनराई ही सौंदर्यात भर
घालणारी होती. परंतु आता या वृक्षांवरच कुऱ्हाड चालली असल्याने . ऐन उन्हाळ्यात हा रस्ता उजाड झाला आहे. कधीकाळी गर्द सावली देणाऱ्या या रस्त्यावर आता सावलीसाठी वृक्ष शोधण्याची वेळ आली आहे.
त्याचप्रमाणे या महामार्गावर बडनेरा पासून ते शिंगणापूर पर्यंत मोठ्या प्रमाणात महामार्गाच्या दुतर्फा अवैद्य वृक्षतोड मोठ्या प्रमाणात सुरू असून याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कोणत्याही अधिकाराचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे.
वृक्षारोपण करण्याची वृक्षप्रेमींची मागणी.
गेल्या काही वर्षाअगोदर यवतमाळ - अमरावती या मार्गावरील दोन्ही बाजूचे शेकडो जुने डेरेदार वृक्ष होती परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ही सर्व झाडे अज्ञाताणि तोडकेली आले.या महामार्गावर ठिकठिकाणी मुळासकट हे वृक्ष उखडून काढण्यात आले आहेत . कित्येक वर्षांपासून सावली देणारे हे वृक्ष आता दिसेनासे झाले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात प्रवास करताना प्रवाशांना या मार्गावरुन सावलीचा आधार होता. परंतु आता ही झाडेच दिसत नाहीत. त्यामुळे आता सावली मिळणे कठीण झाले आहे. या महामार्गावर दुतर्फा वृक्षारोपण करावे, अशी मागणी वृक्षप्रेमी करीत आहेत.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अनेक महत्त्वपूर्ण रस्ते जात असून नांदगाव खंडेश्वर चांदूर रेल्वे रस्त्याची सुद्धा तीच परिस्थिती आहे या रस्त्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड होत असून याकडे सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे या अवैध वृक्षतोडीमुळे या महामार्गावर सुद्धा सावलीकरिता एकही झाड नसल्याचे दिसून येत आहे याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.
Comments