ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात
सितादही करुनच कापुस वेचणी.
नांदगाव खंडेश्वर/ उत्तम ब्राम्हणवाडे
सृष्टीची निर्मिती जारज, श्वेतज, जलज, अंडज, बीजज या सर्व पद्धतीने झाली. बीजजपासून निर्मित कापसाच्या बोंडाने समग्र सृष्टीतील जारज निर्मित मानवाचे अंग झाकून लज्जारक्षण केले. कापसापासून वस्त्र तयार करण्यात आले.
बळिराजाकरिता जणू पांढरे सोनेच सृष्टीने तयार केले. सध्या शेतशिवारांमध्ये हाच कापूस निघाला असून तो वेचण्याची तयारी सुरू झाली आहे. कापूस बोंडातून काढण्यालाच वेचणी म्हणतात, आणि ही वेचणी सुरू करण्यापूर्वी जो काही विधी केला जातो, त्यालाच सीतादही असे ग्रामीण भागात संबोधले जाते.
हरितक्रांतीपूर्वी पारंपरिक बियाणे व नवनवीन आधुनिक तंत्रज्ञान नसल्याने कापूस शक्यतोवर दिवाळीनंतरच निघायचा. हल्ली तंत्रज्ञानाने संशोधित कापूसवाणाचे बियाणे अल्पावधीतच कापूस देते. तसेच सिंचनाची सोय झाल्याने पावसाळ्यापूर्वीच लागवड होत असल्याने विजयादशमी पूर्वीच कापूस वेचणीस सुरुवात होते. बळिराजा व महिला मजूर सीतादही पूजन केल्याशिवाय कापूस वेचत नाही.
पुर्वी शेतकरी ज्वारी सोंगणी, खुडणी, मळणी करून ज्वारी घरात घेत नाही, तोच सीतादहीच्या तयारीलाही लागायचा हल्ली ज्वारी ऐवजी सोयाबीन पिकाकडे वळला. सीतादहीकरिता घरधनीन वेचणीच्या पहिल्या दिवशी गाईच्या दुधाचे विरजण लावून दही तयार करते. सकाळीच मऊ भात शिजवून पूजेची सामुग्री फुले, हळदकुंकू तयार ठेवून सुवासिनी मजुरांकरवी पूजेची आरास केली जाते.
७ दगड धुऊन कपाशीच्या झाडाजवळ मांडून कापूस फुलाच्या गोप्याची प्रतिमा तयार केली जाते. नंतर नवीन कापसास पीळ देऊन त्याचा पाळणा केल्यावर त्यात गोपा निजवला जातो. पूजा संपताच नारळ फोडून साखर मिश्रीत दहीभाताचे बोने शेतात फेकता 'धन्याले धन दे... आमाले अन्न दे... 'अशी आर्जव काळया आईस केली जाते.
बोनं पसरवण्यामागे कापूस पिकावर मित्र किडी येऊन शत्रू कीटकांचा नाश होऊन पीक भरघोस व्हावे, हा हेतू असावा, असे वयोवृद्ध महिला मजुराने सांगितले. सध्याच्या आभासी युगातही शेतकरी सीतादही पूजनाची परंपरा कायम राखून आहे. हे निश्चितच वाखाणण्याजोगे आहे.
Comments