पार्डी( देवी) येथे श्रामनेर व अनागारिंका शिबीर संपन्न.
पार्डी( देवी) येथे श्रामनेर व अनागारिंका शिबीर संपन्न.
उत्तम ब्राम्हणवाडे.
धम्म हा माणसाच्या जगण्याचा मसुदाच आहे.ती मूल्यांतराची आचार आणि विचार प्रक्रिया असून नव्या समतावादी, विज्ञानवादी आणि लोकशाहीवादी सामाजिक पुनर्रचनेची प्रक्रिया आहे म्हणूनच सबंध जगाच्या पुनर्रचनेचे धम्म हे संविधान आहे असे प्रतिपादन डॉ. प्रा. सीमा मेश्राम प्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत यांनी समता सैनिक दल अंजनगाव बारी- पार्डी सर्कल तसेच शिल्पकार फाउंडेशन आयोजित 'पाच दिवशीय श्रामनेर आणि अनागारिका धम्म प्रशिक्षण शिबिर, पार्डी येथील समारोपीय सत्राच्या व्याख्यानात बोलतांना केले.
यावेळी मंचावर शिबिराचे मार्गदर्शक पूज्य भन्ते सुमंगल महाथेरो, शिबिराचे मुख्य मार्गदर्शक भन्ते धम्मसार,मा. जया राऊत उपआयुक्त जात पडताळणी अम. मार्शल संजय आपटे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना मेश्राम मॅडम म्हणाल्या की,' बुद्ध धम्म हा माणसाने माणसांसाठी निर्माण केला आहे. हा एकमेव धर्म ज्याच्या संस्थापकाला ईश्वरीय प्रेरणा किंवा आज्ञा झालेली नाही. दु:ख मुक्तीचा शोध घेतांना सिद्धार्थ बुद्ध यांना लागलेला शोध किंवा अनुभुती म्हणजे धम्म होय. धम्म केवळ जगण्याचा मार्ग दाखवत नाही तर मुक्तीचे अनेक मार्ग प्रशस्त करतो. धम्म स्वतःची आणि समूहाची सतत पुनर्रचना करण्याची प्रेरणा देतो. त्यामुळे मानवीय संबधाने धम्म अग्रगामी आहे.आजच्या पडझडीच्या काळात आंबेडकरी चळवळ मजबूत करण्याची आणि धम्म चळवळीची वैचारिक पताका खांद्यावर घेण्याची जबाबदारी आजच्या युवकांवर येऊन पडलेली आहे.त्यासाठी विहारे एकरूप झाली पाहिजे, विहारे ही शिक्षणाची केंद्रे झाली पाहिजे,जात, धर्म,वर्ण आणि वर्गविरहीत नव्या सामाजिक पुनर्रचनेची सुरुवात अशा शिबिराच्या माध्यमातून होणे गरजेचे आहे,आणि त्यासाठी आंबेडकरी माणसाच्या वैचारिक कक्षा रुंदावल्या पाहिजेत असेही म्हणाल्या.
या समारोपीय सत्राचे प्रास्ताविक संघपाल सरदार,संचलन संजय मोखडे यांनी तर आभार प्रदर्शन राहुल वासेकर यांनी मानले.
शिबिराच्या यशस्वी संयोजनासाठी राजेश गरुड , राहुल वासेकर,वर्षाताई गरुड ,रक्षनाताई सरदार, सुमेधाताई खडसे, निर्मला सोनोने,प्रियंका वासेकर,गिरीश सोनोने, संघशील बडगे, सुनंदा भोगे, सुनंदा बनसोड, प्रणिता वाहने,सुधीर ढेंबरे, सुरेंद्र बनसोड, रुपाली मेश्राम ,दिक्षा वासनिक, नेहा लोहकरे,अतुल सरदार, नरेश वानखडे, मनीष ढेंबरे, अस्मित ढेंबरे,अश्विनी गडलिंग,धनश्री बुंदले,ममता ढेंबरे ,आश्र्विनी ढेंबरे तसेच भीम ज्योत नव युवक मंडळ, प्रज्ञा ज्योती महिला मंडळाच्या सर्व सदस्यांनी व पदाधिकारी आदींनी परिश्रम घेतले.
Comments