पाणपोई झाली बाटलीबंद
माठाच्या पाण्याला नकार
उत्तम ब्राम्हणवाडे.
प्रखर उन्हामुळे उन्हाळ्यात घशाला कोरड पडली की नागरिक मातीच्या माठातील थंडगार पाणी प्यायचे. मात्र, या आधुनिक युगात बदलत्या परिस्थितीमुळे गावातील व परिसरातील नागरिक शुद्ध पाणी मिळावे या उद्देशाने व बंद बाटलीतील पाण्याचा मोठया प्रमाणावर वापर करताना दिसून येत आहेत. आजघडीला शहरासह ग्रामीण भागातही नागरिक विशेषतः युवा पिढी बाटलीबंद पाण्याला प्रतिसाद देत असून प्रत्येकच पानटपरी, किराणा दुकानात हे पाणी उपलब्ध होत असल्याने कधीकाळी गावा-गावात दिसणाऱ्या पाणपोईची संख्यादेखील घटू लागली आहे.
सध्या उन्हाळ्याचा एप्रिल संपला मे महीना सुरू असून अलीकडे हॉटेल चहापाण्याच्या व दुकानासह सर्वच ठिकाणी माठा ऐवजी थंड पाण्याच्या कॅन ठेवल्या जातात. त्यामुळे ग्राहकांना,नागरिकांना थंड पाणी मिळते. त्यामुळे कुंभार समाजातील व्यावसायिकांचे माठ व रांजण वापरण्याचे प्रमाण कमी झाले असून त्यांच्या व्यवसायावरही गदा आली आहे. मातीचे माठ बनविणारे पारंपरिक कारागीर फारच कमी राहिले आहेत या कलेत केवळ जुनीच पिढी शिल्लक राहिली असून नवीन पिढी मात्र रोजगार व नोकरीला पसंती देत आहेत. परिणामी गाव खेड्यातही आता कुंभारवाडे ओस पडत असल्याचे दिसून येत आहे. गरिबांचा फ्रिज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठाला ग्रामीण तसेच शहरी भागात ऐन उन्हाळ्यात मागणी असते.मात्र, काळाच्या ओघात आधुनिक यंत्र आली आणि पारंपरिक पद्धती मागे पडू लागल्या आहेत. त्याचप्रमाणे फ्रिजमुळे या मातीच्या माठांची मागणी घटली आहे. असे असले तरी ग्रामीण भागात आजदेखील कुंभार समाजातील काही जुन्या कारागिरांनी आपली हस्तकला जपण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे. मात्र, अपेक्षीत असा प्रतिसाद आता मिळत नसल्याचे कुंभार बांधव सांगतात. उन्हाळ्यात मातीच्या माठातील पाणी आरोग्यासाठी फायदेशीर असते, तरीसुद्धा काळाच्या ओघात माठ - बनवण्याची कला आता मागे पडू लागली असून त्याची जागा आता फ्रिज व कूल कॅनने घेतली आहे.
-------------------------------------
बाटलीच्या पाण्यावर प्रश्नचिन्ह
-------------------------------------
आजघडीला अनेक कंपन्यांनी पाण्याचा व्यवसाय सुरु केला आहे. कमी खर्चात अधिक नफा मिळत असल्याने व कोणत्याही हंगामात पाणी विक्री होत असल्याने आता छोट्या शहरातही पाण्याच्या बाटलीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जात. मात्र, सदर पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी केली जाते अथवा नाही. याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे बाटलीबंद पाणी शुध्द व सुरक्षित आहे का यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
Comments