मंगरूळ चवाळा मधील रस्ते खड्ड्यात; प्रशासन बघतेय जीव जाण्याची वाट?
मंगरूळ चवाळा मधील रस्ते खड्ड्यात; प्रशासन बघतेय जीव जाण्याची वाट?
उत्तम ब्राम्हणवाडे.
मंगरूळ चवाळा हे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोकसंख्येने व बाजारपेठेने मोठे असलेले गाव आहे. गावामध्ये इयत्ता बारावी पर्यंत महाविद्यालय, 2 बॅंक, स्टेशनरी, ऑनलाईन सेवा देणारे सेंटर, हार्डवेअर, मोबाईल दुरूस्ती शॉप, इ. अनेक सोयी सुविधा देणाऱ्या वस्तू व सेवांची प्रतिष्ठाने आहेत. त्यामुळे बाहेरगावातील नागरिकांची सुद्धा वर्दळ मंगरूळ चवाळा मध्ये बघायला मिळते.परंतु गावातील मुख्य रस्ता सद्या ICU मध्ये दम धरुन आहे अशी रस्त्याची अतिशय दुर्दशा झालेली आहे आणि जोपर्यंत एखादा व्यक्ती रस्ता दुर्घटनेत ICU मध्ये किंवा स्मशानात जात नाही तोपर्यंत प्रशासन कुलर च्या थंड हवेत झोपलेच राहणार का? असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. गावाला फेरा मारणारा रोड अतिशय वाईट स्थितीत असून अनेक वर्षांपासून त्यावर फक्तआश्वासनांचा पाऊस पडतो. त्या पावसाच्या पाण्यात खड्डे दिसेनासे होते आणि अपघातांना आमंत्रण दिल्या जाते. जवळपास २० वर्ष आधी बांधकाम झालेल्या रोडचे आयुर्मान आणखी किती वाढवणार ? गावाला फेरा मारलेल्या या रोडचा एकही चांगला भाग दाखवायला शिल्लक नाही. प्रत्येक ठिकाणी खड्डे किंवा उखरलेला रोड आहे. काही ठिकाणी तर जीव जाण्याच्या शक्यतेचे खड्डे पडले आहेत. फॉरेस्ट नाका परिसर येथे नालीवरील रपटा ला मोठमोठे खड्डे पडले असून त्यात चालता चालता पाय गेला तर अख्खा माणुस खड्ड्यात पडेल. कित्येकदा गाडीचे चाक त्यात फसून अनेकांना इजा झाल्या आहेत. प्रशासन एखादी मोठी घटना घडण्याची वाट बघत ती घडल्यावरच काम करणार आहेत का? अशाच प्रकारची अवस्था गावातून फेरा मारणाऱ्या रिंग रोडची झाली आहे. संपूर्ण रस्ता उखरलेला, प्रचंड खड्ड्यांचा झालेला असून पावसाळ्यात पायदळ चालणे सुद्धा कठीण होते त्याचप्रमाणे प्रचंड दुर्गंधी साचते. म्हणून मोठे अपघात टाळण्यासाठी व गावकऱ्यांच्या सुविधेसाठी लवकरात लवकर या रोडचे काम लागणे गरजेचे आहे.
"गावाला फेरा मारणारा मुख्य रिंग रोड सद्या प्रचंड दुर्दशेत असून नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. रोडला बरीच वर्ष होऊन गेले असताना नवीन रोडची नितांत गरज आहे. फॉरेस्ट नाका येथील रपट्याला प्रचंड मोठे भगदाड पडले असून मोठ्या अपघाताची संभावना आहे. प्रशासनाला वारंवार सांगूनही अपघात रोखण्यासाठी किमान तात्पुरती उपाययोजना सुद्धा केल्या जात नाही आहे. प्राथमिक शाळा ते फॉरेस्ट नाका परिसर ते राम मंदिर परिसर ते विठ्ठल मंदिर परिसर ते रामदेव बाबा चौक ते आठवडी बाजार चौक त्याचप्रमाणे रामदेव बाबा चौक ते मस्जिद या रोडचे काम लवकरात लवकर लागणे आवश्यक झाले आहे."
मनोज गावनेर, (मंगरूळ चवाळा*)
Comments