जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी जनजागृती अभियान.
सखोल चर्चा घडवण्यासाठी विशेषांकाचे प्रकाशन.
उत्तम ब्राम्हणवाडे
जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या अतिशय दुरावस्थेत असून बंद पडण्याचा घाट घातला जात आहे. या शाळांना वाचवण्यासाठी जनजागृती अभियान करण्याच्या अनुषंगाने विशेषांकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद शाळा वाचाव्यात , यासाठी स्वरचित कथा , कविता , चारोळ्या , व्यंगचित्र ,घोषवाक्य लिहून दिनांक 5 जून 2023 पूर्वी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा हिंगणी बु|| ता. तेल्हारा, जिल्हा अकोला या पत्त्यावर पोस्टाने पाठवण्याच्या आवाहन करण्यात आले आहे.
विशेषांकासाठी निवडलेल्या साहित्याच्या लेखकाला एक विशेषांक भेट म्हणून दिल्या जाईल. जिल्हा परिषद शाळा पटसंख्ये अभावी बंद पडत आहेत, गोर गरिबांना, सामान्य जणांच्या मुलांना गावातच दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आजही ह्या शाळा आपले अस्तित्व टिकवून आहेत. परंतु आज वाढती स्पर्धा, खाजगी शाळांची वाढती प्रलोभने यांमुळे पालकांचा कल खाजगी शाळांकडे वळलाय. आज हजारो रुपये फी भरून मुलांना चांगले दर्जेदार शिक्षण शिकवण्याची पालकांची तयारी आहे . परंतु गावातच त्यांना सुशिक्षित करणारी जिल्हा परिषद शाळा आज अंतिम घटिका मोजत आहे. याकडे त्यांचे लक्ष वळवण्याकरिता हा विशेषांक प्रकाशित करण्यात येणार आहे.
भरमसाठ फी भरूनही आवश्यक गुणवत्ता साध्य न झाल्याने वेळ व पैशांचा अपव्यय होतो.
इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंत प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळांमध्ये मोफत दिल्या जात आहे.मग कशाला खाजगी शाळांमध्ये शेती विकून ,व्याजाने काढून,पदरमोड करून बाहेरगावी जाण्यायेण्यासाठी जीव धोक्यात घालून खाजगी शाळेला टाकायचे? या प्रश्नाकडे पालकांचे लक्ष वेधून गावातील शाळांमध्येच मुलांना दाखल करून मुलांच्या मानसिक, भावनिक , बौद्धिक प्रगतीला, वृद्धिंगत करण्याचे आवाहन विशेषांकमधून करण्यात येत आहे.
Comments