शीतपेयांच्या आडून मुलांना लागतेय नशेची सवय.
कॅफेनच्या घटकांचा दुष्परिणाम.
पालकांची वाढली धास्ती.
उत्तम ब्राम्हणवाडे.
उन्हाळ्यामध्ये सर्रास शीतपेयाचा वापर लहानांपासून मोठ्यांपर्यंत केला जातो. मात्र, सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या काही शीतपेयांमध्ये कॅफीन असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शीतपेयाच्या आडून मुलांना नशेची लत लागत आहे. नकळत होणाऱ्या नशेमुळे किशोरवयीन मुले व्यसनाच्या गर्तेत ओढली जात आहेत. या नशेमुळे पालकांमध्ये चांगलीच धास्ती वाढली आहे.
सध्या नांदगाव खंडेश्वर शहरांसह ग्रामीण भागातही शीतपेय व एनर्जी डिंक्स सहज उपलब्ध होत आहेत. अगदी पानटपरीवरही तसेच छोट्या दुकानांमध्ये जीवानावश्यक वस्तूंऐवजी शीतपेयांची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर होत आहे. बदलत्या जीवनशैलीत आरोग्यदायी सरबताची जागा शीतपेयांनी घेतली आहे. गावातही उन्हाळ्यात शीतपेय पिले जाते. विविध कंपन्यांची शीतपेय अगदी छोट्यात छोटी पॅकिंगमधून विक्रीची व्यवस्था व उपलब्धता करण्यात आली आहे. शीतपेय कमी पैशात व सहज उपलब्ध होत असल्याने खरेदी करणारा वर्गसुद्धा चांगलाच वाढला आहे.
या शीतपेयांमध्ये कॅफेनचे प्रमाण असल्याने सौम्य नशा होत आहे. तसेच ती वारंवार पिण्याची इच्छा होत असल्याने नकळत याचे व्यसनच जडत आहे. लहान मुले, महिला व पुरुषही या शीतपेयांच्या आहारी जात आहेत. कॅफेनचे प्रमाण जास्त असणाऱ्या
शीतपेयांचे सेवन केल्यानंतर स्फूर्ती वाढून झोप येत नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थी, तसेच उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी रात्री अभ्यास करताना झोप येवू नये, यासाठी एनर्जी ड्रिंक्सचा वापर करत आहेत.
शालेय परीक्षा झाल्याने बहुतांश चिमुरडी घरीच inअसून सट्टीमध्ये पार्ट्या करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अशा शीतपेयांची खरेदी करत आहेत. शीतपेयच तर आहे, म्हणून त्याकडे पालकांकडून सुद्धा दुर्लक्ष केले जात आहे. मात्र, एनर्जी ड्रिंकसह बहुतांश शीतपेयांमध्ये कॅफेन असल्याचे दाहक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे शीतपेयांच्या आडून मुलांना नशेची लत लागण्याचा धोका संभवतो. आजची मुलं ही उद्याचे भविष्य असल्याने समाज व पर्यायाने देशासाठी ही धोक्याची घंटा ठरणार आहे. एकीकडे व्यसनमुक्तीसाठी शाळा- महाविद्यालयांमध्ये जनजागृती केली जात असताना शीतपेयाच्या गोंडस नावाखाली मुलांना व्यसनाच्या खाईत लोटले जात असल्याने पालकांची चिंता वाढली आहे. मुले शाळेत गेल्यावर मित्र-मैत्रिणींच्या संगतीमध्ये काय करतात? याचा थांगपत्ता लागत नाही. त्यामुळे शाळा परिसरात तंबाखू मुक्तीप्रमाणेच कोल्डिंक्स मुक्त ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
कॅफेनचे असे आहेत धोके
१०० मि.ली. शीतपेयामध्ये २९ मि.ली. कॅफेनचे प्रमाण असते. बाजारपेठेत उपलब्ध शीतपेय ही १००, २००, ३०० ते ५०० मि.ली.पर्यंत उपलब्ध असल्याने त्या त्या प्रमाणात कॅफेन शरीरात जाते. एनर्जी ड्रिंक्सच्या बाटलीवरही साधारणपणे ७५ मि.ली. ग्रॅमपेक्षा जास्त कॅफेन घेऊ नये अशा सूचना असतात. मात्र, त्या केवळ कायदा व कारवाईला हुलकावणी देण्यासाठीच.
Comments