मुलांनो! अंधश्रद्धा सोडून निर्व्यसनी व सुसंस्कृत बना- प्रमोद पोकळे.
दासटेकडीच्या सुसंस्कार शिबिरात १७० विद्यार्थी.
२१ मे रोजी सायंकाळी शिबिराचा समारोप.
उत्तम ब्राम्हणवाडे.
आजच्या धकाधकीच्या काळात मुला-मुलींवर सुसंस्कार करण्यास आई-वडील किंवा पालकांना वेळ नसल्याचे दिसून येत असून मोबाइल व इलेक्ट्रॉनिक्स प्रसार माध्यमांमुळे आजची पिढी पार बिघडत चालली असल्याचे सर्वत्र भेसूर चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळेच भावी पिढी घडविण्यासाठी अशा सुसंस्कार शिबिरांची अत्यंत आवश्यकता असून येथून सुसंस्कार घेऊन, मुलांनो! अंधश्रद्धा सोडून निर्व्यसनी व सुसंस्कृत बना, असा उपदेश भजन गायक प्रमोद पोकळे यांनी दिला.
राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज प्रणित अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या तत्त्वप्रणालीनुसार जीवन शिक्षणाचे आदर्श धडे आजच्या बाल-तरुणांना देऊन देश-धर्म-संस्कृतिला व राष्ट्रीय एकात्मतेला पोषक असा देशाचा भावी नागरिक घडावा, या पवित्र उद्देशाने नियमबद्ध दिनचर्या ठेवून विद्यार्थ्यांमध्ये सद्गुण संवर्धन होण्याच्या दृष्टीने नजिकच्या राष्ट्रसंत अध्यात्म केंद्र, दासटेकडी येथे १ मे पासून सुरू झालेल्या श्रीगुरुदेव सर्वांगीण बाल सुसंस्कार शिबिराला सदिच्छा भेट दिली असता प्रमोद पोकळे बोलत होते.
याप्रसंगी शिबिरातील संपूर्ण शिक्षकवृंदांसह हभप साबळे महाराज, रूपेश मोरे, निलेश मोहोकार, अरुण फंदे, मिन्नाथ पेटकर, निवृत्ती इंदुरकर, नितीन बागडे व छत्रपती राणे आदींची उपस्थिती होती. येथे महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांतून १७० शिबिरार्थी सुसंस्कारांचे धडे घेत असून यावेळी शिबिरातील बाल-गोपालांनी सादर केलेल्या ग्रामगीता, भगवद्गीता व ज्ञानेश्वरी आदी ग्रंथांतील विविध प्रकारच्या ओव्या, श्लोक व सकल साधुसंतांच्या भजन व अभंग आदींच्या गायनाने येथील परिसर रमणीय व भक्तिमय होऊन गेला आहे.
श्रीगुरुदेव राष्ट्रधर्म प्रचार समितीद्वारा संचालित या शिबिराचा समारोप येत्या २१ मे रोजी सायंकाळी ६:३० वाजता अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार असून शिबिराच्या यशस्वितेसाठी शिबीर व्यवस्थापक रवींद्र वानखडे यांचेसह शिबीर प्रमुख रवींद्र ढवळे, रूपेश मोरे, निलेश मोहोकार, आशीष ठाकरे, संकेत वर्हेकर, सदानंद जोगी, योगेश मेंढे, गणेश दखरे, मयुर इंगळे, कमलेश राऊत, अरुण फंदे, दीपक दखरे, छगनराव मोरे व प्रज्ज्वल वांगे आदी मंडळी बौद्धिक, व्यायाम व भजन-संगीताचे प्राथमिक शिक्षण देण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत.
Comments