वृद्ध कलावंत मानधन योजना"अंतर्गत निवड समितीचे गठन केव्हा होणार?

पालकमंत्री ना.फडणवीस यांनी लक्ष देण्याची मागणी.

वृद्ध कलावंत मानधन योजना प्रस्तावाच्या फाइली धुळखात.

उत्तम ब्राम्हणवाडे.
 

     आपले संपूर्ण आयुष्य कला, संगीत व साहित्य सेवेत घालवून मार्गक्रमण करणाऱ्या जिल्ह्यातील वृद्ध कलावंतांच्या मानधन योजना प्रस्तावाच्या फाइली पालकमंत्रीद्वारा अद्यापही "निवड समिती" गठित न केली गेल्याने जिल्हा समाजकल्याण विभागात धुळखात पडल्या असून त्वरित निवड समितीचे गठन करण्याची मागणी केली जात आहे.
 एकीकडे संगीत कला व विविध सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या महाराष्ट्र राज्यातील केवळ यांवरच जीवन अवलंबून असलेल्या लोक-कलावंतांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत असताना दुर्दैवाने शासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेक वृद्ध कलावंतांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. असे असताना मार्च अखेरनंतर जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यावरही वृद्ध कलावंतांचे मानधन योजना प्रस्ताव, पंचायत समिती व समाज कल्याण विभागाचे कार्यालयात मंजुरीसाठी "निवड समिती" अभावी धुळखात पडले असून तात्काळ समिती गठीत करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी जिल्हा वृद्ध कलावंत संघटनेच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आली आहे.
       महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री म्हणून आपली एक कर्तबगार नेता म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर ओळख आहे. राज्यातील वृद्ध कलावंतांच्या गंभीर समस्यांबाबतही आपण जाणून आहात. दोन-तीन वर्षे आधीच्या कोरोना काळातील गंभीर परिस्थितीत वृद्ध कलावंतांच्या कुटुंबातील सदस्यांना कोणत्या परिस्थितीत जीवन जगावे लागले असेल, याचीही आपणास पुरेपूर जाणीव आहेच. केवळ आपली कला सादर करून मिळणाऱ्या अल्पशा व तुटपुंज्या मानधनावर वृद्ध कलावंत आपले कसेबसे जीवन जगून कुटुंबातील सदस्यांचा उदरनिर्वाह चालवित आहेत. मात्र संसाराचा गाडा ओढताना वृद्ध कलावंतांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे, याची आपणास कल्पना असावी म्हणून आपली प्रत्यक्ष भेट घ्यावी असे वाटत असले तरी आपला दौरा म्हणजे तारेवरची कसरतच आहे.
  
  सद्य परिस्थितीतही वृद्ध कलावंतांचे मानधन योजना अंतर्गत प्रस्ताव पंचायत समिती व समाज कल्याण विभागाचे कार्यालयात मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहेत. मात्र, "निवड समिती"च गठित नसल्याने वृद्ध कलावंतांच्या मानधन संबंधित फाइली धुळखात पडल्या आहेत व त्यामुळे वृद्ध कलावंतांना भयंकर मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोरोना महामारीपासून तसेही जनमानसात होणारे जाहीर कार्यक्रम देखील कमी झाल्याने समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालल्या आहेत.‌ आतातर तुम्ही या जिल्ह्याचे पालकत्व मंत्रीपदही स्वीकारले असल्याने वृद्ध कलावंतांच्या या जटील समस्यांकडे पाठ फिरवून कसे चालेल? त्यामुळे आपणास नम्र-प्रार्थना आहे की, या गंभीर बाबीकडे कटाक्षाने लक्ष घालून वृद्ध कलावंतांना भेडसावणाऱ्या समस्यांचे त्वरित निराकरण करावे, ही किमान अपेक्षा धरणे योग्य नव्हे काय? असा प्रश्न सपूर्न जिल्ह्यातील वृद्ध कलावंत यांना पडला आहे वृद्धकलावंतांनी पुढे म्हटले आहे की,
  वृद्ध कलावंतांच्या कुटुंबातील सदस्यांना सुखाने व सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी आपण तात्काळ वृद्ध कलावंत मानधन योजना अंतर्गत "निवड समितीचे गठन" करून लवकरात लवकर वृद्ध कलावंतांच्या समस्या व गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावेत, अशी महाराष्ट्र वृद्ध कलावंत संघटना अमरावती जिल्हा व जिल्ह्यातील तमाम वृद्ध कलावंत यांचेकडून विनंती करण्यात आलेली आहे याकडे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष देण्याची मागणी कलावंतांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

बडनेरा-अंजनगाव बारी-गोळेेगाव बस बंद प्रवासी नागरिक त्रस्त.

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !