नांदगाव खंडेश्वर येथील स्टेट बँक मॅनेजरचा मनमानी कारभार.
पीककर्ज न भरल्याने बचत खाते केले बंद.
शेतकऱ्यांना मात्र कोणतीही सूचना नाही.
उत्तम ब्राम्हणवाडे.
नांदगाव खंडेश्वर येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकाचा मनमानी कारभार सुरू असून शेतकऱ्यांनी पीक कर्ज म्हणून घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याने त्याचे बचत खाते कोणतीही पूर्व सूचना न देता बंद केल्याचा प्रकार नांदगाव खंडेश्वर येथील स्टेट बँकेच्या शाखेत घडला असून याबाबत शेतकरी बँकेच्या शाखा व्यवस्थापक यांना विचारणा करण्यास गेले असता त्यांनी अत्यंत अरेरावीने वागून आणि उद्धटपणे वागणूक देऊन शेतकऱ्यांना अपमानित करण्याचा प्रकार येथे नुकताच समोर आला आहे.तसेच पीक कर्जाची रक्कम बँकेत भरण्याकरिता हे व्यवस्थापक महोदय शेतकऱ्यावर दबाव तंत्राचा वापर करीत आहेत. अशी तक्रार शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे वास्तविक पाहता बचत खाते आणि पीक कर्ज यांचा कुठलाही संबंध नाही परंतु असे असताना सुद्धा शेतकऱ्यांचे बचत खाते परस्पर बंद करण्यामागे शाखा व्यवस्थापकांचा काय उद्देश आहे ? हे समजण्यास मार्ग नाही.तसेच शेतकऱ्यांचे बचत खाते शेतकऱ्यांना न सांगता बंद करण्याचा प्रकार सुद्धा येथे सुरू असल्याने हे शाखा व्यवस्थापक हम करेसो कायदा याप्रमाणे वागत आहेत त्यांच्या या अरेरावी मुळे शेतकरी वर्गात संतापाचे वातावरण दिसून येत आहे.अगोदरच शेतकऱ्यावर नापिकी सारखे नैसर्गिक संकट ओढवले असताना शेतकरी पीक कर्जाची रक्कम भरणार कसे ? हा प्रश्न पडला आहे परंतु अशा परिस्थितीतही शेतकऱ्यांच्या जीवनाशी खेळण्याचा प्रयत्न हे शाखा व्यवस्थापक करीत असल्याचा आरोप त्रस्त शेतकऱ्यांनी लावला आहे सततची नापीकी असल्याने केंद्र आणि राज्य सरकारे ही शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करीत असून त्यांना मदतीचा हात देत आहेत तर दुसरीकडे मात्र नांदगाव खंडेश्वर येथील स्टेट बँकेचे अधिकारी हे शेतकऱ्यांना कोणतीही पूर्व सूचना न देता त्यांचे बचत खाते बंद करीत आहेत त्यामुळे हा एक प्रकारचा शेतकऱ्यावर अन्याय असून स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापक यांचा सुलतानी कारभार असल्याचे मत त्रस्त शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. हा प्रकार शेतकऱ्यांच्या जीवनाशी खेळ असल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे.सध्या शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून पेरणी जवळ आलेली आहे परंतु त्यांच्याकडे बियाणे घेण्यासाठी सुद्धा पैसे नाही अश्या विवंचनेत शेतकरी असताना बँकेचे अधिकारी अश्याप्रकारे वागत असतील तर शेतकऱ्यांनी अपेक्षा करावी तरी कुणाकडून त्यामुळे शेतकऱ्यावर आत्महत्या केल्या शिवाय दुसरा पर्यायच नसल्याचे त्रस्त शेतकऱ्यांनी निवेदनातून म्हंटले आहे.तरी शेतकऱ्यांच्या या समस्येकडे शासनाने आणि स्टेट बँकेच्या वरिष्ठ अधिकारी यांनी जातीने लक्ष देऊन शाखा व्यवस्थापक यांची कानउघाडणी करावी अन्यथा शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा बाध फुटल्या शिवाय राहणार नाही हे मात्र निश्चित. या प्रकाराची तक्रार त्रस्त शेतकऱ्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचेसह जिल्हाधिकारी आणि वर्धा येथील खा.रामदास तडस ,अमरावतीचे खा.अनिल बोंडे,नवनीत राणा यांचेसह आमदार बच्चू कडू आणि प्रताप अडसड यांचेकडे केली आहे आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी निवेदनातून केली असून न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रसिद्धी पत्रकान्वये दिला आहे.
.....................................................................
.....................................................................
--- माझे बचत खाते स्टेट बँकेत आहे त्याच प्रमाणे मी या बँकेतून पीक कर्ज घेतलेले असून कर्ज भरण्यास मला विलंब झाला आहे परंतु कर्ज घेतलेली रक्कम मी पूर्णभरण्यास तयार असूनही स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापक यांनी माझे बचत खाते मला कोणतीही पूर्व सूचना न देता बंद केले आहे. याबाबत मी त्यांना विचारले असता त्यांनी मला अत्यंत उर्मटपणे उत्तर दिले त्यामुळे मी त्याची तक्रार जिल्हाधिकारी यांचेसह पालकमंत्री यांना केलेली आहे.
---- प्रशांत वैद्य
......................................................................
......................................................................
---- शेतकऱ्यांनी दरवर्षी आपले पीक कर्जाचे नूतनीकरण करणे आवश्यक असते जेणेकरून त्यांना नियमित व्याज परतवा मिळण्यास मदत होते.आम्ही दरवर्षी शेतकऱ्यांना SMS व फोन करून नूतनीकरण करण्याचे आवाहन करतो.शेतकरी आपले कर्ज नित्यनियमाने नूतनीकरण करून घेतात परंतु जे शेतकरी कर्ज भरण्यास असमर्थ असतात त्याना आम्ही नूतनीकरण करण्यास मदत करतो. आणि जे शेतकरी कर्ज भरण्यास असमर्थ असतात त्यांना आम्ही कर्ज वाढवून पण देतो. काही शेतकरी हे ३-३वर्ष नूतनींकरण करीत नाहीत किवा नूतनीकरण करण्यास इच्छुक नसतात. त्यांना वारंवार विनंती करून फोन, एसएमएस आणि पत्राद्वारे, कळविले जाते तरी सुद्धा ते कर्ज भरत नाहीत आणि बँकेतही येत नाहीत.त्यामुळे शेतीचे कर्ज बुड़ित होत आहे त्यामुळे आम्ही त्याच्या बचत खात्याला तातपुरत्या स्वरूपाचे होल्ड लावतो, जेणेकरून त्यामुळे शेतकरी बँकेत येण्यास प्रवृत्त होईल आणि आपले कर्ज भरेल हा आमचा उद्देश असतो. बँक ही कोणत्याच शेतकऱ्यांचे खाते कधीच बंद करीत नाहीत. बँक ही शेतकऱ्यांच्या सेवेसाठी सदा तत्पर असते शेतकऱ्यांना काही समस्या असल्यास बँक पूर्णपणे मदतीस कटिबद्ध आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी बँकेत येऊन लवकरात लवकर आपले पीककर्ज खाते नूतनीकरण करून घेणे अपेक्षित आहे.
निखिल शेडामे
शाखा व्यवस्थापक,भारतीय स्टेट बँक,
नांदगाव खंडेश्वर
Comments