सर्वच पक्षांचे वरिष्ठ नेतेमंडळी घेतात जुळवून.
मात्र गावखेड्यातील कार्यकर्त्यांचे काय?
कार्यकर्त्याना पडला प्रश्न.
उत्तम ब्राम्हणवाडे.
पूर्वीचे राजकारण तत्त्वनिष्ठाचे व लोकशाहीला धरून चालणारे राजकारण आणि आजचे राजकारण यामध्ये खूप फरक आढळून येत आहे. पैशातून खुर्ची, खुर्चीतून सत्ता सर्व काही स्वार्थी राजकारण या पलीकडे दुसरे काही पाहायला मिळत नाही.ना विकास ना सर्वसामान्यांचे प्रश्न. सध्या महाराष्ट्रातील राजकीय पटलावर अस्तित्वासाठी आणि स्वहितासाठी कुरघोड्याचे राजकारण सुरू आहे. राज्यात अनेक ज्वलंत प्रश्न असताना सर्वसामान्य मतदारांना गृहीत धरून राजकीय पक्ष कुरघोडीच्या राजकारणात बेमान झाले आहेत. त्याचवेळी बेरोजगारी, महागाई वाढलेले पेट्रोल, डिझेल, घरगुती सिलेंडरचे भाव, भाजीपाला , जीएसटी टॅक्स आदी मूलभूत समस्यांनी बेजार झालेला मतदार सर्वसामान्यांनी समस्या सांगायच्या कुणाला याचे उत्तर शोधत आहेत. यातून मतदारांमध्ये व सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था आहे.
याची दाहकता सर्वच पक्षांना मतदान पेटीतुन सोसावी लागणार असल्याची चर्चा ग्रामीण भागातील सामान्य मतदारांमध्ये सुरू आहे. तर दुसरीकडे विकासाचा गोंडस शब्द पुढे करून आता राज्याच्या सत्तेत तिसऱ्या पक्षाचे नेतेही सहभागी झाल्याने तुमचं जुळलं हो पण आमचं काय असा सवाल ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांतून विचारला जात आहे.
शिवसेनेतून शिंदे गटाने बंड करून भाजपासोबत सलगी करत सत्ता स्थापन केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतः प्रति निर्माण झालेली अपरिहार्यता ही विरोधी पक्षासह सत्ताधारी राजकारणी नेत्याचा कारभार हाकताना मजबूर करत गेली आहे. अर्थात आगामी निवडणुका होईपर्यंत हे प्रश्न हाताळावे लागणार आहेत . या वास्तुस्थितीकडे २०२४ मधील निवडणुकीत मतदार दुर्लक्ष करतील का, सर्वच पक्षांसह नेत्यांना जमिनीवर आणतील का ? हाच खरा प्रश्न आहे.
मागील निवडणुकीत स्थानिक नेत्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे जे आश्वासन दिले होते. त्याचा या नेतेमंडळीला विसर पडला आहे. महागाईने जनता होरपळून निघत आहे. दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत आहे . ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना याचा फटका बसत आहे. त्यांच्या दृष्टीने दैनंदिन गरजा महत्त्वाच्या असतात, कष्ट करून कशी बशी तोंडमिळवणी करीत संसाराचा गाडा हाकताना सिलेंडर पासून सर्वच वस्तू जीएसटीच्या भाराने दुप्पट किमतीने वाढल्या आहेत. याला सर्वसामान्य कंटाळले आहेत. त्याचमुळे कदाचित सर्वच पक्षांना निवडणुका सोप्या असणार
नाहीत असे आतापासूनच मतदार बोलू लागले आहेत. राज्यात अजित पवार यांच्या बंडानंतर संपूर्ण राजकारण ढवळून निघाले आहे. यापूर्वी युतीसाठी नाही नाही म्हणणारे विकासाचा गोंडस शब्द पुढे करून युतीत शामिल झाले आहेत. काका-पुतण्याची राष्ट्रवादी फुटली आहे. एरवी राष्ट्रवादी, भाजप युती कदापि नाही, बिन लग्नाचे राहू शकत नसेल तर चालेल असे म्हणनारे आता मांडीला मांडी लावून बसले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संताप आहे तसेच अश्या दलबदलू नेत्याविरुध कार्यकर्त्यांमध्ये संताप सुद्धा व्यक्त करण्यात येत आहे. यावरून सर्वच राजकीय पक्ष्यांच्या कार्यकर्त्यांनी बोध घेऊन काहीतरी शिकणे अत्यंत महत्वाचे असून यावरून बोध घेणे काळाची गरज बनली आहे.
Comments