जिल्ह्यात पोपट नामशेष होण्याच्या मार्गावर.
अमाप वृक्षतोड,नागरीकरण,शेती व्यवसायातील बदल कारणीभूत
उत्तम ब्राम्हणवाडे
पोपट , कीर, राघू, रावा, शुक, मिठू आदी नामावली असलेले व सर्वांना परिचित असलेल्या पोपटांची संख्या आजमितीला घटत चालली आहे. माणसातील वाच्यतेचे अनुकरण करण्यात तरबेज असलेले पोपट सद्यस्थितीत नजरेस पडेनासे झाले आहेत. रंगीबेरंगी पिसारा, आकर्षक बाकदार चोच व मजबूत शरीरयष्टी लाभलेले व मनुष्यवस्तीला समीपता बाळगून वावरणारे पोपटांची संख्या घटत चालल्याने पक्षीमित्रांमध्ये चिंतेची बाब ठरत आहे.
सिटॅक्युला क्रामेरी या शास्त्रीय नावाने व रोज रिंगड रोड पॅरकीट या इंग्रजी नावाने परिचित असलेले पोपट मनुष्य वस्तीत शिरून कल्ला करण्यात तरबेज असतात. भारतात आढळणाऱ्या पोपटांच्या अनेक प्रजाती आहेत. त्यापैकी सिटॅक्युला प्रजातीचे पोपट सर्वसामान्य आहेत. ते भारतभर निवासी पक्षी म्हणून आढळतात.
हिमालयाच्या पर्वतश्रेणीतील डोंगरांवर सुमारे पंधराशे मीटर उंचीवर, पठारी भागातील मैदानी प्रदेशात, विरळ जंगलांत, शेतशिवारात त्याचप्रमाणे शहरात, उपनगरात तसेच खेड्या-पाड्यात पोपट नेहमीच आढळत असतात.
सगळ्यांच्या माहितीचा आहे. नर पोपटाला राघू म्हणतात व मादीला मैना म्हणतात. सर्व प्रकारची फळे व धान्य हे या पोपटांचे प्रमुख खाद्य आहे. पिकांवर व फळबागेतील फळांवर हल्ला चढवून त्याची खाण्यापेक्षा नासधूसच जास्त करण्यात रस घेतात. खाद्य खाताना ओरडणे व उडताना कलकलाट करणे या कारणांमुळे त्यांना कीर या नावाने ओळखतात.
पोपटांचे अस्तित्व टिकविण्याची गरज.
पूर्वी सगळीकडे मानवी वस्तीसह शेतशिवारात अतिसुलभतेने नजरेस पडणारे पोपटांचे थवे आता दुर्मीळ झाले असून, आपल्याला पोपट सहजासहजी नजरेस पडत नाहीत. मानवी जीवनशैलीतील बदल, अमाप वृक्षतोड, नागरीकरण, शेती व्यवसायातील बदल आदी कारणांनी पोपटांचा नैसर्गिक अधिवास नष्ट झाला आहे. पोपटांचे अस्तित्व टिकविण्यासाठी जनजागृती निर्माण व्हायला हवी. त्यांना नैसर्गिक अधिवासासाठी पोषक वातावरण निर्माण करून द्यायला हवे.
Comments