शहरातील प्रशासकीय कार्यालयांच्या भिंती रंगल्या....
खर्रा शौकीनांचा प्रताप
प्रशासनाचेही दुर्लक्ष ;दंडाची कारवाई नावालाच
उत्तम ब्राम्हणवाडे
आम्ही कोठेही थुंकण्याचे व्रत सोडणार नसल्याचा पवित्रा खर्रा शौकीन थुंकप्रेमी नागरिकांनी घेतला आहे. याची प्रचिती नांदगाव खंडेश्वर शहरातील विविध शासकीय प्रशासकीय इमारतीत दिसून येते. नागरिकांना कोरोनामुळे स्वच्छतेचे महत्त्व पटले आहे.नांदगाव खंडेश्वर शहरातील सर्वच प्रशासन स्वच्छतेसाठी प्रामाणिकपणे कार्यरत आहे. मात्र, खर्रा शौकीन नागरिक व स्वतः काही कर्मचारी कार्यालयाचा परिसर लालेलाल करण्याचे व्रत सोडण्यास तयार नाहीत. परिणामी पंचायत समिती , नगरपंचायत, स्थानिक प्रशासकीय इमारत, एसटीचे बसस्थानक आदींसह सर्वच प्रशासकीय कार्यालय परिसरात पिचकाऱ्यांचे सडे पडल्याचे चित्र आहे.
तालुका प्रशासनासह नगर पंचायत प्रशासन शहरात स्वच्छता रहावी, यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे. काही सामाजिक संघटना देखील स्वच्छतेचे कार्य मनापासून करीत आहेत. प्रशासकीय प्रमुखांनी जर कार्यालय परिसरात फेरफटका मारला तरी त्यांना वस्तुस्थिती समजून येईल.
काही कर्मचाऱ्यांना तर तोंडात गुटका भरला असल्याने बोलता देखील येत नाही. समोर नागरिक आले तर आपल्या तोंडातील थुक खाली पडू नये याकरिता तोंड वर करुन बोलतात. कर्मचाऱ्यांची ही गत असताना पिकप्रेमी नागरिक देखील काही कमी नाहीत. प्रशासकीय कार्यालयातील
स्वच्छतागृहे, रस्त्याकडेला असलेल्या खिडक्यांचे कोपरे, येण्या-जाण्याचा परिसरात पिचकाऱ्या दिसल्या नाहीत तर नवलच. दरम्यान, शासकीय कार्यालयातील रंगलेल्या भिंती पाहता प्रशासनाने स्वच्छतेचे महत्व दुसऱ्यांना पटवून देण्याआधी कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घेऊन त्यांना व्यसनापासून परावृत्त करण्याची गरज निर्माण झाली आहे.
तंबाखूप्रेमींना कार्यालयात बंदी
अनेक मोठ्या शहरात बिग बाजार, मल्टिप्लेक्समध्ये जायचे असेल तर तुम्हाला कोणतीही वस्तू आत नेता येत नाही. तंबाखूजन्य पदार्थ असतील तर ते तपासणी करणाऱ्या व्यक्तीकडे काढून द्यावे लागतात. ते लगेचच त्याला केराची टोपली दाखवतात. त्यामुळे मल्टिप्लेक्स परिसर तसेच आतील भाग हा स्वच्छ असतो. त्याच धर्तीवर सर्वच प्रशासकीय कार्यालयांनी तंबाखूजन्य पदार्थाना केराची टोपली दाखविणे गरजेचे आहे. नागरिकांना देखील तपासणी करुनच त्यांना आत सोडणे गरजेचे आहे. ही प्रक्रिया वेळखाऊ वाटत असली तरी सर्वांनाच शिस्त लावण्यासाठी आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी हे गरजेचे असल्याचे मत जागरूक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
कुठे घाण तर कुठे स्वच्छता
तहसील कार्यालय परिसरात सुदैवाने अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनीही स्वच्छतेचा मंत्र मोठ्या प्रमाणात जोपासला असल्याचे दिसत आहे. परंतु तेथून जवळच असणाऱ्या पंचायत समिती इमारत परिसरात पिचकाऱ्याचे सडे नजरेस पडतात. विशेष म्हणजे, शहरातील वेगवेगळ्या परिसरातील प्रशासकीय इमारतीला पाहणी केल्यास तेथे थुंकू नका या फलकाखालीच गुटख्याच्या पिचकाऱ्या दिसून येतात.
Comments