टिमटाला (अमरावती) ते कन्याकुमारी विशेष रेल्वेगाडी सुरू करा.
जिल्ह्यातील खासदारांप्रमाणेच श्रीपाल सहारे यांचे रेल्वेमंत्र्यांना निवेदन.
उत्तम ब्राम्हणवाडे
जगप्रसिद्ध कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद शिलास्मारकाचे शिल्पकार श्रध्देय एकनाथजी रानडे यांचे जन्मगाव असलेल्या टिमटाळा (जि.अमरावती) ते कन्याकुमारी विशेष रेल्वेगाडी सुरू करण्यासाठी पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते श्रीपाल सहारे यांनी जिल्ह्यातील खासदारांप्रमाणेच रेल्वेमंत्र्यांना निवेदन सादर केले आहे.
सविस्तर वृत्त असे की, कन्याकुमारी येथे स्वामी विवेकानंदांचे जगप्रसिद्ध वास्तुशिल्प उभारणारे श्रध्देय एकनाथजी रानडे यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्याच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील टिमटाळा या छोट्याशा गावात दि. १९ नोव्हेंबर १९१४ रोजी झाला होता.
जागतिक स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणारे एकनाथजी रानडे यांचे जन्मगाव विकासापासून कोसो दूर होते. शंभर वर्षांनंतर शेवटी यशस्वी पाठपुराव्यामुळे केंद्रीय मंत्री पियुषजी गोयल यांनी सन २०१६ मध्ये खासदार आदर्श दत्तक ग्राम योजनेअंतर्गत दत्तक घेतले.
विकासाची बरीच कामे सुरू झाली मात्र खूपच कमी कामे पूर्ण झाली. तरीही शासन आणि प्रशासन यांपासून अनभिज्ञ आहे. एकनाथजी रानडे यांची जयंती शासनस्तरावर साजरी करण्यात यावी यासाठी व अन्य काही मागण्यांसाठी मागील वर्षभरापासून गावकऱ्यांच्या वतीने श्रीपाल सहारे हे प्रयत्न करीत आहे.
त्यापैकीच एक म्हणजे टिमटाळा (अमरावती) ते कन्याकुमारी विशेष रेल्वेगाडी सुरू करणे, जेणेकरून एकनाथजींच्या जन्मभूमी ते कर्मभूमी पर्यंतचा प्रवास करणे सोयीचे ठरेल.
याकरिता श्रीपाल सहारे यांच्यातर्फे अमरावती लोकसभेच्या खासदार सौ. नवनीतजी राणा. अमरावतीतील राज्यसभेचे खासदार डॉ. अनिलजी बोंडे, वर्धा लोकसभेचे खासदार रामदासजी तडस.
यांच्याप्रमाणेच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनीजी वैष्णव साहेब यांना नुकतेच निवेदन पाठवण्यात आले आहे. विशेष म्हणजे टिमटाळा गावापासून चार किलोमीटर अंतरावर असणारे टिमटाळा रेल्वे स्टेशन हे अमरावती पासून जवळचे रेल्वेस्टेशन आहे. टिमटाळा रेल्वे स्टेशन हे छोटेसे रेल्वे स्टेशन असल्याने येथून रेल्वे गाडी सुरू होणे कठिण असले.
तरी नजीकच्या अमरावती रेल्वे स्टेशन पासून कन्याकुमारी पर्यंत विशेष रेल्वे गाडी सुरू करणे अशक्य नाही त्यामुळे अमरावती ते कन्याकुमारी पर्यंत विशेष रेल्वेगाडी सुरू करावी.
आणि तिला टिमटाळा(अमरावती) ते कन्याकुमारी जन्मभूमी एक्सप्रेस नाव द्यावे अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते श्रीपाल सहारे यांनी केली आहे.
Comments